मध्यरात्रीचा ‘तो’ फोन अन् राष्ट्रवादीत खळबळ! बड्या आमदाराला राजीनाम्याचा इशारा; उद्याच्या बैठकीत मोठा निर्णय?


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या शांततेआड मोठं राजकीय वादळ घोंघावत असल्याची चर्चा आहे. पक्षातील एका विद्यमान आमदाराला थेट राजीनामा देण्याचा निरोप पोहोचल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा संदेश पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून गेल्याची चर्चा रंगली असून, उद्या मुंबईत होणारी राष्ट्रवादी आमदारांची बैठक आता अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत नाराजी समोर आली होती. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रात कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावं होती, मात्र त्यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने पक्षात नाराजी पसरल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत सुनील तटकरेही उपस्थित होते.

याच बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र शरद पवारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर आता आणखी एका मोठ्या घडामोडीने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता वाढवली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेतृत्वाकडून राज्यपाल नियुक्त आमदार इद्रीस नायकवडी यांच्या आमदारकीचा राजीनामा मागण्यात आला आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ओएसडींनी नायकवडी यांची भेट घेतली होती. यावेळी पक्षाकडून राजीनामा देण्याचा संदेश देण्यात आल्याची चर्चा आहे.

मात्र इद्रीस नायकवडी यांनी हा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे. “अजित पवार यांनी मला कोणतीही सूचना दिलेली नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता पक्षातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नायकवडी यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चर्चेला येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बैठकीत नेमकं काय ठरणार, पक्षात आणखी धक्कादायक निर्णय होणार का आणि अजित पवार गटातील नाराजीचं पुढचं पाऊल काय असेल, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!