“मी जिवंत आहे!”… 20 दिवस मृत समजलेली शिवानी अचानक समोर; जळगाव-जामोद ‘मृतदेह’ प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, पोलीस तपासावर प्रश्नांचा भडिमार!


जळगाव जामोद : एक अर्धवट जळालेला मृतदेह, बेपत्ता तरुणीचा संशय, वडील-भावाची अटक आणि कोर्टात दिलेलं कथित कबुलीचं वक्तव्य… या सगळ्यामुळे गाजत असलेल्या जळगाव-जामोद प्रकरणात अचानक असा ट्विस्ट आला की पोलिसांसह संपूर्ण यंत्रणाच हादरून गेली आहे. 20 दिवसांपासून मृत समजली जाणारी शिवानी कळमेकर थेट पोलीस ठाण्यात हजर झाली आणि “मी जिवंत आहे” असा जबाब दिल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण कथानकच उलटलं.

राजुरा धरण परिसरात 26 एप्रिल रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. प्राथमिक चौकशीत तो मृतदेह खडकी गावातील बेपत्ता असलेल्या 26 वर्षीय शिवानी कळमेकरचा असावा, असा पोलिसांचा अंदाज झाला. त्यानंतर तपास वेगाने पुढे गेला आणि शिवानीचे वडील बापूराम कळमेकर व भाऊ अजय कळमेकर यांना संशयावरून अटक करण्यात आली.

पोलिसांनी न्यायालयात दोघांनी गुन्हा कबूल केल्याचा दावा केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. मात्र या संपूर्ण प्रकरणाला मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा 28 मे रोजी स्वतः शिवानी खगनार पोलीस ठाण्यात हजर झाली. तिने आपण जिवंत असल्याचे सांगत वडील आणि भावाची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली.

या अचानक घडलेल्या घडामोडीमुळे तपास यंत्रणेची मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण अजूनही अर्धवट जळालेल्या मृतदेहाची अधिकृत ओळख पटलेली नाही आणि फॉरेन्सिक अहवालही पूर्ण झालेला नाही. तरीही पोलिसांनी तो मृतदेह शिवानीचाच असल्याचा निष्कर्ष काढल्याने तपास पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शिवानी जिवंत आढळल्यानंतर न्यायालयानेही तिचे वडील आणि भावाला दोषमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोघांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पुराव्याशिवाय अटक, घाईघाईत घेतलेले निष्कर्ष आणि तपासातील त्रुटी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अर्धवट जळालेला मृतदेह नेमका कोणाचा, याचा शोध अजूनही लागलेला नाही.

पोलिस प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांना मुख्यालयात जमा केल्याची माहिती मिळत आहे, मात्र वरिष्ठ पातळीवर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणेची भूमिका, पुरावे आणि निर्णय प्रक्रिया यावर मोठा वाद निर्माण झाला असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!