राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय फायदा? येवल्यात शिवसेनेचे 7 नगरसेवक भुजबळ गटाच्या संपर्कात


येवला : नाशिक जिल्ह्यातील येवल्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी हालचाल दिसून येत आहे. विधान परिषदेतील पराभवानंतर दराडे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे सात नगरसेवक अचानक मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतली.

या भेटीमुळे हे सातही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर आमदार किशोर दराडे आणि कुणाल दराडे यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे. विकासकामांमध्ये अपेक्षित लक्ष न दिले जाणे, संघटनात्मक समन्वयाचा अभाव आणि स्थानिक नेतृत्वाशी असलेले मतभेद या कारणांमुळे ही नाराजी उफाळून आल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी भुजबळ गटाशी जवळीक वाढविल्याने येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी मजबूत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा घडामोडींचा मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही बैठक महायुतीच्या विकासकामांच्या दृष्टीने घेण्यात आली होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे स्थानिक प्रतिनिधी एकत्र येऊन शहराच्या विकासावर चर्चा करण्यात आली. सर्वांना एकत्र घेऊन येवला शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तथापि, या घडामोडींमुळे येवल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!