संभाजीनगरात २२ वर्षीय तरुणीचा धक्कादायक कारनामा! कॉलेजमधूनच चालवायची गांजाचे रॅकेट, तरुणांना बनवायची ग्राहक; पोलिसांनी ठोकल्या बेड्या..


छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या २२ वर्षीय तरुणीकडून गांजाची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना गांजा विक्रीच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप या तरुणीवर आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने मुकुंदवाडीतील राजनगर परिसरात सापळा रचून तिला अटक केली. तिच्याकडून १११ ग्रॅम गांजा आणि रोकड असा एकूण ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी संपर्क वाढवत होती. विशेष म्हणजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तरुणांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. कॉलेज परिसरातील विद्यार्थ्यांना लक्ष्य करून गांजाची विक्री केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी राजनगर परिसरात रचला सापळा

मुकुंदवाडीतील राजनगर भागात एक तरुणी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित तरुणीला ताब्यात घेऊन तिच्याकडील गांजा आणि रोकड जप्त करण्यात आली.

गांजाचा पुरवठा करणारा मुख्य सूत्रधार कोण?

या कारवाईनंतर गांजाचा पुरवठा नेमका कुठून होत होता, संबंधित तरुणीला हा अमली पदार्थ कोण पुरवत होते आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून तरुणीच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करत असून गांजा विक्रीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!