“मुलगी ऐकत नव्हती… म्हणून संपवलं!”; आधी बांबूने वार, मग मुंडकं वेगळं करून जाळलं शरीर, १२ दिवसांनी ऑनर किलिंगचा थरार उघड

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शेतात अर्धवट जळालेलं, मुंडकं नसलेलं महिलेचं धड सापडल्यानंतर पोलिसांसमोर मोठं कोडं उभं राहिलं होतं. मात्र तब्बल १२ दिवसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आणि समोर आलं ते अंगावर काटा आणणारं वास्तव… जन्मदात्या वडिलांनीच स्वतःच्या मुलाची मदत घेऊन विवाहित मुलीची हत्या केली होती. कारण? मुलगी प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हती!

२६ एप्रिल रोजी राजुरा शिवारातील एका शेतात अर्धवट जळालेला मृतदेह आणि काही अंतरावर मानवी कवटी आढळून आली होती. मृतदेहाचे मुंडके वेगळे करण्यात आल्याने ओळख पटवणं कठीण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची सूत्रे देण्यात आली.
पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, बेपत्ता महिलांच्या नोंदी आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने पोलिसांना मध्यप्रदेशातील खकनार पोलीस ठाण्यात शिवानी बापूराम कलमेकर नावाची महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. संशय वाढल्यानंतर पोलिसांनी तिचे वडील बापूराम कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शिवानीचं लग्न १५ एप्रिल रोजी धारणी येथील युवकासोबत झालं होतं. लग्नानंतर ती माहेरी आली होती. मात्र तिचे जवळच्या नात्यातील युवकासोबत प्रेमसंबंध सुरूच होते. कुटुंबीयांनी वारंवार समजावूनही ती संबंध तोडायला तयार नव्हती. यामुळे घरात सतत वाद होत होते.

अखेर २३ एप्रिलच्या रात्री रागाच्या भरात वडील बापूराम यांनी शिवानीच्या डोक्यात बांबूने जोरदार वार केला. ती जागीच कोसळली. त्यानंतर मुलगा अजयच्या मदतीने दोघांनी मृतदेह घरातच लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी रात्री मोटारसायकलवरून मृतदेह राजुरा शिवारात नेण्यात आला. तिथे ओळख पटू नये म्हणून त्यांनी मुलीचं मुंडकं धडापासून वेगळं केलं, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आणि कपडे तसेच हत्यारे जंगलात फेकून दिली.
धक्कादायक म्हणजे, गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी मुलगी घरातून निघून गेल्याची खोटी तक्रारही पोलिसांत दाखल केली होती. मात्र तांत्रिक तपास, हालचालींचे तपशील आणि चौकशीतील विसंगतीमुळे अखेर सत्य बाहेर आलं.
या थरारक ऑनर किलिंगमुळे बुलढाणा आणि मध्यप्रदेश सीमावर्ती भागात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.