शरद पवारांची प्रकृती बिघडली! अजित पवारांचा लगेच काकांना फोन, काय म्हणाले अजित पवार?

मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केले होते. शरद पवारांना खोकला येत असल्यामुळे बोलण्यास अडचण येत होती.
एका जाहीर कार्यक्रमात त्यांना भाषणही देता आले नाही. त्यानंतर त्यांनी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कार्यक्रमादरम्यान भाषणात त्यांना वारंवार खोकल्याचा त्रास होत असल्याचे दिसून आले होते.
मात्र तरीही ते पुण्यातून कोल्हापूरच्या दौऱ्यावर गेले. तिथं नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर पवार यांची प्रकृती आणखीनच बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून पवार सध्या मुंबईत आहेत.
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी काल शरद पवार यांना फोन करत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसंच पूर्णपणे बरं वाटेपर्यंत विश्रांती घ्यावी, अशी विनंतीही अजित पवारांनी काकांना केल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबात संघर्ष निर्माण झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर कुटुंबातील तणावाचं वातावरण निवळण्यास सुरुवात झाली असून कुटुंबातील विविध सदस्य सार्वजनिक कार्यक्रमांनिमित्त एका व्यासपीठावर येत असल्याचं दिसत आहे.
त्यातच आता शरद पवार यांच्या आजारपणात अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याने राजकीय वाटा वेगळ्या झालेलं हे कुटुंब पुन्हा एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.