उरुळी कांचन येथे आज शरद पवारांची तोफ धडकणार , विरोधकांंचा कसा समाचार घेणार म्हणून मोठी उत्सुकता ..!!
उरुळी कांचन : शिरुर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बस स्टॉप शेजारील मैदानावर शरद पवार यांची आज पाच वाजण्याच्या सुमारास सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार गट) पार्टीचे उरुळी कांचन शहराध्यक्ष रामदास तुपे व सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी दिली आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार डॉ. अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची उरुळी कांचन येथील बस स्थानकाच्या परिसरात सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, सचिन आहेर, देविदास भन्साळी, शरद पवार गटाचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप गोते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ही पहिलीच जाहीर सभा असून शरद पवार या प्रचार सभेत विरोधकांचा कसा समाचार घेणार याबाबत मोठी
उत्सुकता लागली आहे.
उपस्थितांवर असणार लक्ष ..!
शरद पवार हे उरुळी कांचन स्थित महात्मा गांधी सर्वोदय संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या संस्थेसाठी भरीव अशी मदत देऊ केली आहे. अशावेळी खुद्द शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने या भागात कशाप्रकारे त्यांच्या पक्षाला मताधिक्य मिळणार का ? म्हणून चर्चा सुरू आहे. या सभेला या संस्थेचे विश्वस्तांसह कोण उपस्थित राहणार म्हणून मोठी उत्सुकता असणार आहे.