दुष्काळाच्या प्रश्नावर शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; शेतकऱ्यांना दिलं आश्वासन, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून, अद्याप काही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला नाही. पुरंदर तालुकाही दुष्काळाच्या यादीतून वंचित असल्याचे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार असल्याचे सांगितले.
शरद पवार सध्या पुरंदर दौऱ्यावर असून, त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी पवार यांच्यासमोर मांडल्या. सध्या शेतात उभी असलेली पिके वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांनी २७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्या केल्या होत्या. राज्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असले तरी निकषांमध्ये बसणाऱ्या आणि अद्याप वंचित राहिलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या प्रमुख मागण्या
शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध मागण्या केल्या आहेत. त्यातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत—
वंचित राहिलेल्या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा.
दुष्काळग्रस्त भागातील संपूर्ण जमीन महसूल माफ करावा.
शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायासाठी घेतलेल्या विविध कर्जांना कर्जमाफी द्यावी. यामध्ये सहकारी, राष्ट्रीयीकृत आणि अर्बन बँका तसेच पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज बिले माफ करावीत.
दुष्काळग्रस्त भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी तसेच वसतिगृह आणि मेस फी माफ करावी.
रोजगार हमी योजनेचे निकष शिथिल करून मागणी असेल त्या ठिकाणी तातडीने रोजगाराची कामे सुरू करावीत.
पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्यासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत.
टंचाईग्रस्त गावांमधील कृषी पंपांची वीज खंडित करू नये. तसेच दुष्काळग्रस्त भागात लोडशेडिंग करू नये.
शरद पवार यांनी यापूर्वीही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यांच्या २७ सप्टेंबरच्या पत्रात एकूण १७ मागण्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांसाठी सरकारकडून विविध मदत उपाययोजना सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. सध्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
