शरद पवार घरी परतले, पण भेटीगाठींनी राजकीय गणित तापलं! सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीपासून विलिनीकरणाच्या चर्चेपर्यंत नेमकं काय घडलं?


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून दोन दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र, रुग्णालयातील उपचारांपेक्षा पवारांच्या भेटीसाठी आलेले राजकीय नेते, सुनेत्रा पवारांची अनुपस्थिती आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे.

पुण्यापासून मुंबईपर्यंत उपचारांचा प्रवास

२ नोव्हेंबर रोजी खोकला आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागल्याने शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमांवरून याबाबत माहिती दिली होती. पवारांच्या वैद्यकीय तपासण्या सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले होते.

४ नोव्हेंबर रोजी त्यांना रुबी हॉलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी त्याच दिवशी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे दोन दिवस उपचार आणि विश्रांती घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. खोकला आणि कफाचा त्रास असला तरी सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांसह सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शरद पवार सिल्व्हर ओक या निवासस्थानी रवाना झाले.

पवारांची भेट घेण्यासाठी नेत्यांची रीघ

शरद पवार रुग्णालयात दाखल असल्याचे समजल्यानंतर विविध पक्षांतील नेत्यांनी त्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे सचिन अहिर, खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि उद्धव ठाकरे यांनीही पवारांची विचारपूस केली होती. डिस्चार्जनंतर उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेणार असल्याची माहिती होती.

सुनेत्रा पवारांनी दोनदा वेळ घेऊनही भेट टाळली?

या भेटीगाठींमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीची विशेष चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या कार्यालयाकडून शरद पवारांच्या भेटीसाठी दोन वेळा वेळ मागण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता भेटीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दोन्ही वेळा ठरूनही सुनेत्रा पवार रुग्णालयात पोहोचल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रफुल्ल पटेलांच्या भेटीनंतर विलिनीकरणाची चर्चा

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला. त्यातच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत महत्त्वाचे विधान केले. अजित पवार हयात असताना दोन्ही पक्ष एकत्र आणण्यासाठी बैठका झाल्या होत्या आणि त्याची माहिती आपल्याला देण्यात आली होती, असे तटकरे यांनी सांगितले. अजित पवार असते, तर चर्चेत असलेली १२ फेब्रुवारीची तारीख निश्चित झाली असती आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसल्या असत्या, असेही त्यांनी म्हटले.

अजित पवार यांच्या निधनानंतर ही प्रक्रिया मागे पडल्याचे तटकरे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. त्यामुळे पटेल-पवार भेट आणि तटकरे यांच्या विधानाकडे राजकीय घडामोडींच्या दृष्टीने पाहिले जात आहे. सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट न घेण्यामागे विलिनीकरणाच्या चर्चांचा काही संबंध आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या घटनांचा परस्पर संबंध असल्याचे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. आता दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!