बीड सरपंच हत्या प्रकरणी शरद पवार यांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, प्रकरण आता वेगळ्या वळणावर…

बीड : मागील काही दिवसांपासून राज्याचे नाव मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय हत्या आणि खंडणी प्रकरणात सहभागी असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
बीडमधील घटनांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. बीड प्रकरणात जे लोकप्रतिनिधी आवाज उठवत आहेत त्या लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना योग्य ती सुरक्षा पुरवावी, अशी मागणी करणारे पत्र नुकतंच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. या पत्रानंतर आता पवार यांनी फोनवरून देखील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्याची माहिती आहे.
दरम्यान, हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाला तपासाबाबत आदेश द्यावेत आणि बीडसह राज्यातील विविध ठिकाणी उद्योगांना खंडणी मागणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.