शनि -शिंगणापूर बनावट अँप प्रकरण ; कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत तब्बल १ कोटीहून अधिक रक्कम, पोलीस तपासाला वेग

पुणे : गेल्या काही दिवसापासून शनि शिंगणापूर देवस्थान संबंधित बनावट अँप प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.यात देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत तब्बल १ कोटीहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी पोलीस प्रशासन करत असून त्यांनी हे पैसे पुढे कोणाला दिले? यामध्ये नेमकं कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी तपासाला अधिक वेग आला आहे.

शनी शिंगणापूर येथील बनावट अँप प्रकरणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर असून देवस्थानच्या नावाचा गैरवापर करून कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या आधी सायबर विभागाच्या चौकशीनंतर शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात पूजा परिसेवा डॉट कॉम, नवग्रह मंदिर डॉट कॉम, ऑनलाइन प्रसाद डॉट कॉम, हरी ओम अॅप आणि इपूजा डॉट कॉम या पाच बनावट अॅप्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिस आता देवस्थानच्या अधिकृत ऑनलाइन ॲपची देखील चौकशी करत असून अधिकृत ॲपच्या माध्यमातून संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले का याचा देखील पोलीस तपास करत आहेत. त्याचबरोबर या पोलीस तपासात आणखीन बनावट अँप उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

