माणिकराव कोकाटेंना शनिदेव पावले! खातं जाणार, पण मंत्रीपद वाचलं, आता ‘हे’ खातं मिळणार..

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना विधानपरिषदेत मोबाइलवर पत्ते खेळणं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना भोवलं आहे. त्यामुळे विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

मात्र आता त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांचे मंत्रिपद अबाधित राहणार आहे. त्यांना आता दुसऱ्या एका खात्याचे मंत्री बनवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात बैठक झाली होती, यात कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांचे खाते बदलले जाणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आता माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे खातं सध्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे आहे. तर भरणे यांना आता कृषिमंत्रीपदाचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे. सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता हे खातेपालट केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याचा अंतिम निर्यण अद्याप झालेला नाही.

दरम्यान, रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक त्यांचा राजीनामा मागत आहेत. मात्र आता कोकाटे यांचे खाते बदलले जाणार आहे. त्यामुळे विरोधक यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.