फुरसुंगीच्या ११ सायकलवीरांची जगन्नाथ पुरीपर्यंत सायकलवारी! सात दिवसांत १,६०० किमीचा प्रवास; चार राज्ये पार करत घेतले जगन्नाथाचे दर्शन

लोणी काळभोर : जिद्द, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हवेली तालुक्यातील फुरसुंगी सायकलिस्ट ग्रुपच्या ११ सायकलवीरांनी फुरसुंगी ते जगन्नाथ पुरी (ओडिशा) असा तब्बल १ हजार ६०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या सात दिवसांत पूर्ण केला. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा चार राज्यांतून दररोज सरासरी २५० किलोमीटर अंतर पार करत सायकलस्वारांनी जगन्नाथ मंदिरात पोहोचून आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता केली. त्यांच्या या साहसी ‘सायकलवारी’चे सर्वत्र कौतुक होत आहे.
या मोहिमेला गुरुवारी (ता. १२) पहाटे साडेतीन वाजता फुरसुंगी येथील ग्रामदैवत श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सोलापूर, संगारेड्डी, खम्मम, राजमुंद्री, विशाखापट्टणम आणि ब्रह्मपूर असा प्रवास करत बुधवारी (ता. १८) सायकलवीर जगन्नाथ पुरी येथे पोहोचले. या मोहिमेदरम्यान ओडिशा राज्यात सायकलस्वारांना प्रचंड वादळ, समोरून वाहणारे वेगवान वारे आणि पावसाचा सामना करावा लागला. मात्र, प्रतिकूल हवामान आणि शारीरिक थकव्यावर मात करत त्यांनी प्रवास सुरूच ठेवला.

विशेष म्हणजे, या मोहिमेतून केवळ साहसाचे प्रदर्शन न करता पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेशही देण्यात आला. आंध्र प्रदेशातील तुन्नी गावात सायकलस्वारांनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संकल्पही अधोरेखित केला. या मोहिमेत गुणवंत गायकवाड सर, राम लावंड, प्रवीण भोसले सर, जीवन पवार, प्रशांत कामठे, तानाजी अडागळे, राघवराव, प्रशांत लोंढे, गोरखभाऊ कामठे, किरण कामठे आणि संतोष मसुडगे यांनी सहभाग घेतला.

यापूर्वीही या ग्रुपने पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, तिरुपती बालाजी आणि अयोध्या राम मंदिर अशा विविध धार्मिक स्थळांच्या सायकल मोहिमा यशस्वी केल्या आहेत. सात दिवसांत १,६०० किलोमीटरचा टप्पा पार करणाऱ्या या सायकलवीरांचे लोणी काळभोरसह फुरसुंगी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.

