मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड! भाजप-शिंदे गट एकत्र लढणार; सहकार पॅनलवर शिक्कामोर्तब


मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. दोन्ही पक्ष सहकार पॅनलच्या माध्यमातून मैदानात उतरणार आहेत. मात्र, जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

यासंदर्भात आज शिवसेना नेते आणि उपसभापती सचिन अहिर यांच्या दालनात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप नेते प्रवीण दरेकर, सचिन अहिर आणि मंत्री उदय सामंत उपस्थित होते. बैठकीत महायुती म्हणून निवडणूक लढवण्यावर एकमत झाले. जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती आहे.

बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींसोबत पुन्हा चर्चा होणार असून, त्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हे निश्चित होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाकडून स्वतंत्र लढण्याचीही चाचपणी

मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याबाबत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून यापूर्वी चाचपणी करण्यात आली होती. पाडव्याच्या मुहूर्तावर बाळासाहेब भवन येथे यासंदर्भात बैठकही झाली होती. या बैठकीला उपसभापती सचिन अहिर, उपमहापौर संजय घाडी, मंगेश सातमकर यांच्यासह मुंबईतील विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख उपस्थित होते.

त्यामुळे शिंदे गट भाजपसोबत निवडणूक लढवणार की स्वतंत्र पॅनल उभे करणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र, आजच्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात २० सदस्य

मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात सध्या २० सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्यासह ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!