बारामतीत सुनेत्रा पवारांना धक्का; कारखान्याच्या अध्यक्षांचं बंड, भाजप नेत्याच्या साथीने स्वतंत्र पॅनेल..


बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नवे राजकीय समीकरण समोर आले आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेपासून वेगळी वाट स्वीकारत स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली आहे.

भाजपचे नेते आणि पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या सहकार्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे.

वानेवाडी (ता. बारामती) येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पुरुषोत्तम जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ही निवडणूक पक्षविरहित लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत, ‘शेतकरी हाच आपला पक्ष आहे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. कारखाना हा शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी जोडलेला असल्याने कोणताही स्वार्थ न ठेवता कारखाना सांभाळण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींना संचालक मंडळात संधी मिळायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

अजित पवारांच्या स्वप्नासाठी लढत राहणार

दिवंगत अजित पवार यांच्या कुटुंबाचा आदर राखून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. तसेच, संबंधितांना अनुभव नसतानाही कारखाना सांभाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या निवडणुकीत अपेक्षित प्रयत्न झाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी संजय जगताप, सुदाम इंगळे आणि माणिकराव झेंडे यांच्या सहकार्याने निवडणूक लढल्याचा उल्लेख करत, अजित पवार यांच्या स्वप्नासाठी आपण यापुढेही काम करत राहणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. ‘आमच्या वडिलांनी द्यायला शिकवले, घ्यायला नाही,’ असे म्हणत कोणावरही टीका न करता आपले काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवे समीकरण

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिलेल्या पुरुषोत्तम जगताप यांनी आता स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलसोबत निवडणुकीत आणखी एक पॅनेल रिंगणात उतरणार आहे. या निर्णयामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील स्थानिक राजकीय समीकरणे बदलली आहेत.

अजित पवारांचे नाव वापरण्यावरून वादाची शक्यता

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी यापूर्वी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. दिवंगत अजित पवार यांचे नाव आणि छायाचित्र त्यांच्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू नये, अशी भूमिका या पत्रातून मांडण्यात आली आहे.

दुसरीकडे, पुरुषोत्तम जगताप यांनी आपल्या पॅनेलला ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ असे नाव दिले आहे. त्यामुळे या नामकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे. स्वतंत्र पॅनेलच्या घोषणेनंतर पक्षाची पुढील भूमिका आणि निवडणुकीतील स्थानिक समीकरणे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!