यमुना एक्सप्रेसवेवर बसला भीषण आग; आईला वाचवताना तरुणाचा मृत्यू, ९ प्रवाशांचा होरपळून अंत..

नवी दिल्ली : यमुना एक्सप्रेसवेवर दिल्लीहून महोबाकडे जाणाऱ्या खासगी एसी स्लीपर बसला भीषण आग लागून ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर एका मुलाने आईला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे.
गुडघ्याच्या त्रासामुळे वेगाने धावणे किंवा खिडकीतून उडी मारणे आई सुनीता गुप्ता (४७) यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा शशांक गुप्ता (२८) याने स्वतःचा जीव धोक्यात घातला. बसला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी शशांकलाही बाहेर येण्याची विनंती केली होती. त्याच्याकडे स्वतःचा जीव वाचवण्याची संधीही होती.

मात्र, आईला एकटं सोडून जाण्यास त्याने नकार दिला. आईच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलेल्या शशांकचा काही क्षणांतच विषारी धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याची आई सुनीता गुप्ता यांचाही मृत्यू झाला.


शशांक गुरुग्राम येथे इंडिगो एअरलाइन्समध्ये अभियंता म्हणून कार्यरत होता. बसमधून काहीतरी जळत असल्याचा वास येत असल्याची माहिती प्रवाशांनी चालकाला दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चालक आणि वाहकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
एसी यंत्रणेतील संभाव्य शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत ९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याने बस चालक आणि ट्रॅव्हल्स प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात संबंधितांवर कोणती कारवाई होणार, तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
