संभाजीनगरमध्ये खळबळ! वैद्यकीय विद्यार्थिनीचा हॉस्टेलमध्ये संशयास्पद मृत्यू; २० वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ कायम, पोलिसांकडून तपास सुरू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातील एमजीएम (MGM) महाविद्यालयाच्या वसतिगृहात २० वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फिजिओथेरपीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह गुरुवारी (२६ नोव्हेंबर) सायंकाळी वसतिगृहातील खोलीत आढळून आला. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.
निकिता राजू गायकवाड (वय २०, रा. आंबेकरवाडी, नांदेड) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस सर्व अंगाने तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निकिताने याच वर्षी एमजीएम महाविद्यालयात फिजिओथेरपीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. ती गंगा वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत तिच्याच क्लासमधील दोन मैत्रिणींसोबत राहत होती. गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ती उठली, मात्र तिने महाविद्यालयात जाण्यास नकार दिला आणि ती खोलीतच थांबली.

तिच्या दोन्ही रूममेट्स महाविद्यालयात गेल्या होत्या. सायंकाळी साडेचार वाजता त्या वसतिगृहात परतल्या असता खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी वारंवार हाक मारूनही निकिताने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यावेळी खोलीचा मागचा दरवाजा उघडा असल्याचं दिसल्याने त्यांनी आत प्रवेश केला. तेव्हा निकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हा प्रकार लक्षात येताच रूममेट्सने तातडीने घटनेची माहिती कॉलेज प्रशासनाला दिली.

घटनेची माहिती मिळताच एमजीएम प्रशासनाने डॉक्टरांना घटनास्थळी पाठवलं. मात्र तपासणीत तिची नाडी सुरू नसल्याचं स्पष्ट झाले. सिडको पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे पाठवला आहे.
पोलिसांनी खोलीची पाहणी केली असता कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही; परंतु तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी निकिताचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. निकिताने आत्महत्या केली की तिच्यासोबत काही घातपात घडला, या दोन्ही अंगाने सिडको पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार संशयास्पद वाटत असला, तरी शवविच्छेदन रिपोर्टनंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.
