महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी खेळ! ५ जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार

मुंबई : राज्यात सध्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. काही भागांत पहाटे आणि रात्री थंडीचा जोर वाढत आहे, तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई आणि कोकणात उकाडा वाढणार?
मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात पहाटे आणि रात्री काहीसा गारवा जाणवेल. मात्र, दुपारच्या वेळी उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे. या भागात आकाश निरभ्र राहून हवामान उष्ण आणि कोरडे राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत सकाळी व रात्री गारठा वाढू शकतो. या भागातील कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १० ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना पहाटे आणि रात्री थंडीचा सामना करावा लागू शकतो.

स्कायमेटचा हवामानाबाबत काय अंदाज?
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम दिशेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. उत्तर भारतातील डोंगराळ भागांत तापमानात मोठी घट झाली आहे. सध्या कोणतेही वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय नसल्याने देशात अतितीव्र थंडीची शक्यता कमी आहे. मात्र, उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्र आणि तेलंगणापर्यंत जाणवू शकतो. त्यामुळे राज्यातील काही भागांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता
एकीकडे राज्यात थंडी वाढत असताना दुसरीकडे सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. रात्री आणि पहाटे गारवा जाणवेल, तर दुपारच्या वेळी उकाडा वाढू शकतो. राज्यात सध्या कडाक्याच्या थंडीचा अंदाज नसला तरी नोव्हेंबरअखेर तापमानात बदल होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कसे असेल हवामान?
मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पहाटे हलका गारवा, तर दुपारी उन्हाचा चटका जाणवू शकतो. या भागात कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातही शुक्रवारी आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. दिवसा चांगला सूर्यप्रकाश, तर रात्री आल्हाददायक थंडी जाणवेल. या भागात कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
घाटमाथ्यावरील भागांत गारठा वाढू शकतो. त्यामुळे आगामी विकेंडला राज्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.
