रोहित पवारांसाठी आत्या मैदानात! सुप्रिया सुळेंची जाहीर माफी; म्हणाल्या, ‘हात जोडून अंतःकरणातून माफी मागते’

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पुण्याला कठोर पालकमंत्री द्या किंवा सुनेत्रा पवार यांना अधिक ताकद द्या. अजित पवार यांच्याप्रमाणे पुण्याच्या पालकमंत्र्यांना काम करता येत नाही, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले होते.
या वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक झाला असून, रोहित पवार यांच्याविरोधात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण वादावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे. रोहित पवार यांच्याकडून अनावधानाने हे वक्तव्य झाले असून, त्यांनी स्वतः त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा विषय आता संपायला हवा. मात्र, संबंधितांना माझ्याकडूनही माफी अपेक्षित असेल, तर मी मनापासून माफी मागते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

रोहित पवार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रोहित यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल आधीच माफी मागितली आहे. एखाद्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वाद पुढे वाढवू नये. आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रोहित यांनी माफी मागितल्याचे वृत्त माध्यमांवर पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आंदोलन करणाऱ्या महिला नेत्या आणि आपण अनेकदा एकत्र जेवलो आहोत, एकत्र काम केले आहे. त्यामुळे कदाचित त्यांच्यापर्यंत रोहित यांनी माफी मागितल्याची माहिती पोहोचली नसेल. रोहित यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार गटातील नेते, पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांच्या वतीने आपण अंतःकरणपूर्वक माफी मागत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
या वक्तव्यामुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा रोहित पवार किंवा त्यांच्या पक्षाचा हेतू नव्हता, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी हा वाद थांबवण्याचे आवाहन केले आहे.
