सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ भेटीने राजकारण ढवळलं; सुनील तटकरे थेट शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : राज्यातील राजकारणात बुधवारी अचानक एक अशी भेट घडली, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे थेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी, संघटनात्मक बदल आणि पक्षातील वाढत्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीतून ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना वगळण्यात आल्याच्या चर्चांमुळे आधीच राजकीय वातावरण तापले होते. त्यातच तटकरे यांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पक्षातील त्यांचे महत्त्व कमी झाल्याच्या चर्चांदरम्यान झालेली ही भेट विशेष लक्षवेधी ठरत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील तटकरे हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागत होते. मात्र पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना वेळ मिळत नव्हती. अखेर आज भेटीसाठी वेळ मिळाल्यानंतर तटकरे थेट सिल्व्हर ओकवर दाखल झाले.

दरम्यान, या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी कोणतीही राजकीय चर्चा झाल्याचे नाकारले. “पवारसाहेबांची तब्येत ठीक नव्हती. ते ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी सिल्व्हर ओकवर आलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, “आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मी गुवाहाटीला गेलो होतो. तेथून परतताना शरद पवार यांच्या भेटीची वेळ मिळाल्याचे कळाले आणि मी थेट सिल्व्हर ओकवर आलो,” असेही तटकरे यांनी सांगितले.
मात्र राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादीतील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट केवळ प्रकृती विचारपूस करण्यापुरती मर्यादित नसावी. अजित पवार गटातील वाढती नाराजी, संघटनात्मक बदल आणि आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या भेटीकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.
या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये नव्या राजकीय हालचाली सुरू होणार का, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.