अभ्यासक म्हणाले, सरकारचा GR एकदम ओक्के! मनोज जरांगे म्हणाले, एका तासात मुंबई…

मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पवित्रा घेतली आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं. यामुळे मराठ्यांनी एकच जल्लोष केला आहे.

मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यावेळी उपस्थित होते. त्यांनी सरकारचा तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना माहिती दिली.
उपसमितीच्या वतीने करण्यात आलेल्या शिफारशी या योग्य असल्याची खात्री अभ्यासकांनी दिली आहे. आता त्याचा जीआर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले होते. त्यावर राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखालील मराठा उपसमितीने जरांगे यांची भेट घेतली.
मराठा आरक्षणासाठी हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. त्यावर उपसमितीने मोठा निर्णय घेतला. हैदरबाद गॅझेट मान्य करत असून त्याचा तातडीने जीआर काढण्याची तयारी उपसमितीने दर्शवली. त्यामुळे नात्यातील, कुळातील आणि गावातील लोकांची चौकशी करून कुणबी सर्टिफिकेट दिले जाणार आहे.
दरम्यान, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी पंधरा दिवसांचा अवधी उपसमितीने मागितला आहे. औंध आणि सातारा गॅझेटमधील तरतुदी किचकट असल्याने हा वेळ मागितला आहे.
मराठा उपसमितीने ज्या मागण्या शिफारशी केल्या आहेत त्यावर मराठा अभ्यासकांनी आणि वकिलांनी चर्चा केली. त्यानंतर उपसमितीच्या शिफारशी योग्य असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं. त्यानुसार उपसमितीकडून आता एका तासात त्या संबंधी जीआर काढणार असल्याचं सांगण्यात आलं.
जीआर काढा, एका तासात मुंबई रिकामी करतो..
राज्य सरकारने मसुद्यातील शिफारशींसबंधी जीआर काढावा, त्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार मराठा उपसमितीने जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू केली.
राज्य सरकारने आपल्या मागण्यांसबंधी जीआर काढावा, त्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असा शब्द मनोज जरांगे यांनी दिला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईमध्ये आंदोलकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मुंबईची गती काहीशी मंदावल्याचं दिसून आलं. त्यावर जीआर आल्यानंतर आपण आंदोलन मागे घेऊ, एका तासात मुंबई रिकामी करू असं जरांगे म्हणाले.