संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला बारावीत घवघवीत यश, राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव…

बीड : काही महिन्यांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या दुःखद प्रसंगानंतर देशमुख कुटुंबावर मोठा आघात झाला. यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. असे असताना संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
यामुळे मोठ्या कठीण प्रसंगात तिने मोठं यश मिळवले असून तिचे कौतुक केले जात आहे. आज जाहीर झालेल्या निकालात वैभवीने ८५.३३ टक्के गुण मिळवत आपल्या दिवंगत वडिलांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. यामुळे तिचे हे यश मोठं आहे.
वैभवीला इंग्रजीत ६३, मराठीत ८३, गणितात ९४, फिजिक्समध्ये ८३, केमिस्ट्रीत ९१ आणि बायोलॉजीत तब्बल ९८ गुण मिळाले आहेत. तिने एकूण ६०० पैकी ५१२ गुण मिळवत हे यश मिळवले आहे. मोठ्या दुःखाच्या प्रसंगात तिने अभ्यास केला. राज्यात फिरून वडिलांना न्याय मागितला.
आता वैभवीच्या या यशाने संपूर्ण गावात आणि परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून, ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कठीण प्रसंगातही हार न मानता पुढे जाण्याचे उदाहरण वैभवीने आपल्या कृतीतून घालून दिले आहे. येणाऱ्या काळात देखील तिला वडिलांची कमी भासणार आहे. मात्र ती वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे तिने सांगितले.