Sanjay Raut : आम्ही तुमच्या सारखे जिना फॅन्स क्लबचे…..!!! अमित शहा यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खरमरीत उत्तर…
Sanjay Raut : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे असल्याचे वक्तव्य अमित शहा यांनी केले होते.
अमित शहा म्हणाले, कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले आहेत, याकुब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर ठाकरे बसले आहेत, झाकिर नाईक यांना शांतता दूत बनवणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत.
पीएफआय या संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत, संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांना पण हे साथ देत आहेत, यांना लाज वाटली पाहिजे. राज्यात ‘ औरंगजेब फॅन क्लब म्हणजे कोण तर ते म्हणजे महाविकास आघाडी आणि या औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत उद्धव ठाकरे, अशी बोचरी टीका अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती.
दरम्यान, त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, औरंगजेब फॅन्स क्लबचे सदस्य असं म्हणत अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे पण मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही.
आम्ही पाकिस्तानात जिनांच्या कबरीवर जाऊन कधी फुलं उधळली नाहीत किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केकही खाल्ला नाही. मुळात देशातील राष्ट्रवादी मुस्लीमांची बाजू मांडणं यात काहीही चुकीचे नाही. या देशाच्या संघर्षाच्या काळात मुस्लिमांनीही योगदान दिले आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.