“परत आलात तर मारून पाठवेन, कॅमेरा बंद कर”; पत्रकारांवर संतापले संजय दिना पाटील, वादग्रस्त वक्तव्यांनी राजकारण तापलं

मुंबई : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांसोबतच्या वादानंतर केलेल्या आक्रमक वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केलेल्या दिना पाटील यांना त्यांच्या अलीकडील वक्तव्यांबाबत प्रश्न विचारण्यासाठी पत्रकार गेले असता वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.

माध्यम प्रतिनिधींनी त्यांना काही दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानांबाबत विचारणा केली. त्यावेळी संतापलेल्या दिना पाटील यांनी, “कॅमेरा बंद कर, नाहीतर मी खासदार आहे हे विसरेन,” असे म्हणत नाराजी व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी “माझ्या घरासमोर फिरू नका”, “परत इथे आलात तर मारून पाठवेन”, “जे करायचं ते करा, तक्रार करायची असेल तर करा” अशा शब्दांत पत्रकारांना इशारा दिल्याचे समोर आले आहे.
या वादादरम्यान त्यांनी स्वतःच्या भूमिकेचे समर्थनही केले. “मी जे बोललो ते लपूनछपून नाही, उघडपणे बोललो. माझ्यावर कारवाई करायची असेल तर पोलीस करतील, मी चौकशीला तयार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादाबाबत त्यांना फारशी चिंता नसल्याचेही त्यांच्या बोलण्यातून दिसून आले.

यावेळी त्यांनी राजकीय प्रतिस्पर्ध्यांवरही निशाणा साधला. काही नेते स्वतः सुरक्षित ठिकाणी राहून इतरांना भडकवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, “माझा सामान्य शिवसैनिकांशी कोणताही वाद नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही मला अनेक निवडणुकांत मदत केली आहे,” असे सांगत त्यांनी जुन्या राजकीय संबंधांची आठवण करून दिली.

संजय राऊत यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांचाही त्यांनी उल्लेख केला. पूर्वी निवडणुकांमध्ये मदत करणारे नेते आज आपल्यावर टीका करत असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला. काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना, “ज्या घटनेचा उल्लेख केला जातो ती माझ्या जन्मापूर्वीची आहे,” असे त्यांनी म्हटले.
सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे शिंदे गटात प्रवेशानंतरच्या त्यांच्या भूमिकेचा. “मी ज्या लोकांसोबत गेलो आहे ते ठाम भूमिका घेणारे आहेत. माझ्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्याऐवजी त्यांनी माझी बाजू समजून घेतली,” असे सूचक विधान त्यांनी केले.
दरम्यान, पत्रकारांशी झालेल्या या वादानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना लोकप्रतिनिधींनी संयम राखावा, अशी मागणी होत असताना दिना पाटील यांच्या वक्तव्यांमुळे नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.