पेट्रोल पंपांवर दादागिरी पडू शकते महागात! अफवा, साठेबाजी अन् कॅनमध्ये इंधन नेल्यास थेट गुन्हे दाखल


नांदेड : राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर सध्या एकच चित्र पाहायला मिळत आहे… वाहनांच्या लांबच लांब रांगा, “डिझेल संपणार” या भीतीने नागरिकांची धावपळ आणि काही ठिकाणी थेट दादागिरी. इंधन टंचाईच्या चर्चेमुळे निर्माण झालेल्या घबराटीचा परिणाम आता प्रत्यक्ष पंपांवर दिसू लागला असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अफवा पसरवणे, साठेबाजी करणे किंवा नियम मोडून कॅन-ड्रममध्ये इंधन नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा नांदेडचे जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवार यांनी दिला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून मुंबईतील काही भागातही पेट्रोल पंप बंद असल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनधारकांनी तासन्तास रांगा लावल्या आहेत. तर काही पंपांवर कर्मचाऱ्यांसोबत वाद, हुज्जत आणि हाणामारीचे प्रकारही समोर आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तात इंधन विक्री सुरू करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात सध्या पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, डिझेलची मागणी अचानक ३० ते ३५ टक्क्यांनी वाढल्याने तणाव निर्माण झाला आहे. “ही प्रत्यक्ष टंचाई नाही, तर पॅनिक पर्चेसिंगमुळे तयार झालेली परिस्थिती आहे,” असे बारदेवार यांनी सांगितले. नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, आजपासून नांदेड जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर कॅन आणि ड्रममध्ये डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. महसूल अधिकारी आणि पोलिसांची संयुक्त पथके विविध पंपांवर नजर ठेवून आहेत. सोशल मीडियावर डिझेल टंचाईबाबत खोटे मेसेज किंवा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर आयटी ॲक्टनुसार कारवाई केली जाणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात इंधन साठवून ठेवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डिझेलसाठी मोठ्या रांगा लागत होत्या. अनेक वाहनधारक आणि शेतकरी मध्यरात्रीपासूनच पेट्रोल पंपांवर थांबत असल्याचे चित्र होते. मात्र, प्रशासनाने वाहनांची कागदपत्रे तपासूनच डिझेल वितरण सुरू केल्याने गेल्या दोन दिवसांत गर्दीत काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!