शेजारच्या व्यापाऱ्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध; बॉयफ्रेंडच्या मदतीने लोहगडावर केतनची हत्या, पोलिसांनी सांगितली थरारक स्टोरी..


पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू मानल्या गेलेल्या या घटनेमागे हत्या असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे केतन अग्रवाल यांच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल हिने तिचा मित्र तथा प्रियकर चेतन चौधरी यांच्या मदतीने हा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा उलगडा करताना पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावरून पडल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटनेनंतर केतन आणि सिया यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी भेट दिली होती. मात्र, तपासादरम्यान काही बाबी संशयास्पद आढळून आल्या.

केतन हा अनुभवी ट्रेकर होता. त्याने यापूर्वी अनेक गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग केले होते. त्यामुळे अशा प्रकारे तोल जाऊन दरीत पडणे संशयास्पद वाटत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. कुटुंबीयांनीही या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास पुढे नेत असताना चेतन चौधरी याचे नाव समोर आले. सिया गोयल आणि चेतन चौधरी हे मागील वर्षभरापासून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच केतन अग्रवाल याला मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी केतन आणि सिया लोहगडावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी चेतन चौधरीही त्यांचा पाठलाग करत होता. योग्य संधी साधून सिया आणि चेतन यांनी केतनला धक्का दिल्याचा आरोप असून, त्यानंतर तो सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणामुळे पुणे आणि परिसरातील व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!