..तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी आमचा पाठिंबा; रोहित पवारांचे मोठे आणि खळबळजनक विधान

लालसगाव : लालसगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी कांदा दर, शेतकरी संकट आणि शासन धोरणांवर जोरदार टीका करत मोठे राजकीय विधान केले आहे. कांद्याला जाहीर केलेला 12 रुपये प्रति किलो भाव हा शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे अन्यायकारक असून तो परवडणारा नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “सध्याचे दर असेच राहिले तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल, आत्महत्येची परिस्थिती निर्माण होऊ शकते,” असे शेतकऱ्यांच्या भावना असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेले विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. “जर शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळाला, त्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले, तर आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देऊ,” असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन चर्चेला उधाण आले आहे.
रोहित पवार यांनी केवळ भाववाढीचा मुद्दाच नव्हे तर नाफेड खरेदी प्रक्रियेवरही गंभीर आरोप केले. नाफेडमार्फत कांदा खरेदीमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करण्याची मागणी केली. “नाफेडमध्ये भ्रष्टाचार होत आहे, सत्तेतील काही नेते या प्रक्रियेत सामील आहेत, त्यामुळे चौकशी होत नाही,” असा थेट आरोप त्यांनी केला.

याचवेळी त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका न घेण्यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि शेतकरी हिंदू नाहीत का? असा थेट सवाल केला. तसेच शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचा अपमान होत असताना काही नेते गप्प का राहतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही रस्त्यावर उतरून लढत आहोत, मात्र काही नेते केवळ वरिष्ठांच्या आदेशावर बोलतात. शेतकऱ्यांच्या मुलांना योग्य दर, योग्य बाजारभाव आणि न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
पेपरफुटी, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रशासन आणि व्यवस्थेवरही टीका केली. काही प्रकरणांमध्ये पारदर्शक तपास होत नसल्याचे सांगत त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
या संपूर्ण दौऱ्यात कांदा दर, नाफेड खरेदी, शेतकरी आंदोलन आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे वातावरण तापले असून रोहित पवारांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.