कोरेगावमूळ येथील व्यावसायिक दशरथ शितोळे यांच्या बंगल्यावर दरोडा! साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीला…

उरुळी कांचन : घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील एका नामांकित व्यावसायिकाच्या घरात घुसून सुमारे साडेनऊ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, महागडे मनगटी घड्याळ असा मुद्देमाल चोरी करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, उरुळी कांचन पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात गुरुवारी (ता.11) रात्री साडेअकरा ते शुक्रवारी (ता.12) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी निलिमा दशरथ शितोळे (वय 43, रा. इनामदार वस्ती, कोरेगाव मूळ ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात राहतात. गुरुवारी (ता.11) रात्री साडेअकरा ते शुक्रवारी (ता.12) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवीन बंगल्यातील पाठीमागचा दरवाजाचे कडी कोयंडा कशाचे तरी साह्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

यावेळी घरातील तिजोर ठेवलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, किमती मनगटी घड्याळे असा एकूण 9 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पलायन केले होते.

याप्रकरणी निलिमा शितोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात बी.एन.एस. कलम. 305 (a), 331(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ठिकाणी दौंड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरु केली आहे, तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे करीत आहेत.