हवेलीत ‘महसूल अदालत’ कार्यक्रम संपन्न, पहिल्याच सुनावणीत ‘एवढ्या’ प्रकरणे काढली निकाली…

पुणे : महसूल प्रशासनाने नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबवावे असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या अंतर्गत हवेली येथे ‘महसूल अदालत’ हा उपक्रम नुकताच संपन्न झाला आहे.

नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नये आणि काम जलद गतीने होऊन जावे म्हणून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकाभिमुख उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले होते. हवेलीचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली “महसूल न्यायालय” कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे.
दरम्यान, राबवण्यात आलेल्या या उपक्रमात १७० प्रकरणांपैकी १२८ प्रकरणे पहिल्याच सुनावणीत निकाली काढण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, नागरिकांनी महसूल प्रशासनाने त्यांच्या समस्या त्वरित सोडवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

या महसूल अदालतमध्ये एकत्रीकरण कायद्याविरुध्द व्यवहार नियमानुसार नियमित करून कार्यवाही करणे, कुळकायदा कलम ८४ क स पात्र, गौणखनिज उत्खननाबाबत पारित केलेले आदेश, फेरफार बाबतची अपील प्रकरणे, वारस हक्कांचे फेरफार, कलम ८४ क शी संबंधित प्रकरणे, उत्तराधिकार हक्क आणि उत्परिवर्तन, ७/१२ च्या नोंदींमधील दाखल शेरे कमी करण्यासह अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे यासाठी दर महिन्याला “महसूल न्यायालय” घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या उपक्रमामुळे महसूल प्रशासनावरील भार कमी होईल आणि नागरिकांचे प्रश्न लवकर सुटणार आहेत, दरम्यान, काही नागरिकांच्या कागदपत्रांची त्रुटी लक्षात घेऊन प्रलंबित प्रकरणे १ महिन्यात निकाली काढण्यात येणार असून त्याची माहिती www.eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॉ. यशवंत माने, उपविभागीय अधिकारी हवेली यांनी सांगितले आहे.