जूनमध्ये निवृत्ती, त्याआधीच सीबीआयची धाड! ‘तिसरी मनीषा’ अटकेत; सदाशिव पेठ हादरली


पुणे : जून महिन्यात निवृत्तीची तयारी सुरू होती… शाळेत निरोप समारंभाच्या चर्चा रंगत होत्या… पण त्याआधीच सीबीआयची गाडी थेट घरासमोर येऊन थांबली आणि सदाशिव पेठेत एकच खळबळ उडाली. नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार यांना सीबीआयने अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात अटक झालेल्या ‘मनीषा’ नावाच्या त्या तिसऱ्या आरोपी ठरल्या आहेत.

नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून केंद्रीय अन्वेषण विभागाने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. याआधी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांच्यावर कारवाई झाली होती. आता मनीषा हवालदार यांचे नाव समोर आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मनीषा हवालदार या राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आल्या होत्या. येत्या जून महिन्यात त्या सेवानिवृत्त होणार होत्या. मात्र निवृत्तीच्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर कारवाई झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मनीषा मांढरे आणि हवालदार यांच्यात चांगली ओळख होती आणि दोघींमध्ये सातत्याने संपर्कही होता.

शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सीबीआयचे पथक सदाशिव पेठेतील लक्ष्मी निवास सोसायटीत दाखल झाले. जवळपास सात तास फ्लॅटमध्ये कसून चौकशी आणि झाडाझडती सुरू होती. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले. त्यानंतर सीबीआयने हवालदार यांना ताब्यात घेत अटक केली.

मनीषा हवालदार गेली २३ वर्षे शाळेत कार्यरत होत्या. त्यांच्या अटकेनंतर संस्थेने तातडीची बैठक घेत त्यांना सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. संस्थेचे सचिव सतीश गवळी यांनी प्रतिक्रिया देताना, “त्या एनटीएमध्ये तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या, याची आम्हाला कल्पनाच नव्हती. या घटनेमुळे शाळेची प्रतिमा मलीन झाली आहे,” असे सांगितले.

दरम्यान, सीबीआयच्या पथकाने गुरुवारीच शाळेत जाऊन मुख्याध्यापिकांच्या केबिनमधील संगणकाची हार्ड डिस्क, सीसीटीव्ही चित्रफिती आणि काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. या संपूर्ण प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!