सोशल मीडियावर अर्थमंत्र्यांचा कथित ‘तो’ व्हिडिओ पाहून गुंतवले 1 कोटी; पुण्यातील निवृत्त अधिकाऱ्यासोबत झाला मोठा गेम


पुणे : पुण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठी सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बनावट व्हिडिओ दाखवून एका 56 वर्षीय निवृत्त हवाई दल अधिकाऱ्याला तब्बल ₹1 कोटी 7 लाखांचा गंडा घालण्यात आला.

घोरपडी परिसरात राहणारे तक्रारदार हे कापड व्यावसायिक असून त्यांनी सोशल मीडियावरील फॉरेक्स ट्रेडिंगशी संबंधित जाहिरातीवर विश्वास ठेवला. त्यानंतर सायबर भामट्यांनी त्यांच्याकडून डीमॅट खाते उघडून घेतले आणि विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला ₹1,000 नफा त्यांच्या खात्यात जमा केला.

त्यानंतर आरोपींनी इलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीचा IPO उपलब्ध असल्याचे सांगत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून तक्रारदारांनी 36 वेगवेगळ्या बँक खाती आणि UPI आयडीवर मिळून ₹1.07 कोटी हस्तांतरित केले.

सायबर भामट्यांनी तयार केलेल्या बनावट ट्रेडिंग ॲपमध्ये तक्रारदाराला ₹3.98 कोटींचा नफा दिसत होता. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न करताच आणखी रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. त्यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी सर्व संपर्क तोडला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संगीता देवकाते पुढील तपास करत आहेत.

पोलिसांचे आवाहन: सोशल मीडियावरील मोठ्या परताव्याचे आश्वासन देणाऱ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तींचे चेहरे वापरून तयार केलेल्या गुंतवणुकीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर किंवा अधिकृत सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!