“आम्ही पाठीवर नाही तर छातीवर वार करणारे”; गोकुळ गीतेंच्या विजयानंतर रेश्मा काळेंचा थेट पलटवार, महायुतीतील नाराजी उघड

नाशिक : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने राज्यातील बहुतांश जागांवर वर्चस्व राखले असले तरी नाशिकमधील निकालाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या गोकुळ गीते यांनी अनपेक्षित विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या निकालानंतर महायुतीतील काही नेत्यांकडून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त होत असून जळगावमधील शिवसेना नेत्या रेश्मा काळे यांच्या प्रतिक्रियेची विशेष चर्चा रंगली आहे.

नाशिकमध्ये महायुतीने नरेंद्र दराडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र भाजपशी संबंधित मानले जाणारे गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीपूर्वी महायुतीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पातळ्यांवर चर्चा झाली. तरीही गीते यांनी माघार न घेता लढत कायम ठेवली आणि अखेर 389 मतांसह विजय मिळवला.
या निकालानंतर जळगावमध्ये महायुतीसाठी उमेदवारी मागे घेणाऱ्या रेश्मा काळे यांनी प्रतिक्रिया देताना पक्षनिष्ठेचा मुद्दा उपस्थित केला. महायुतीच्या एकजुटीसाठी आम्ही वैयक्तिक राजकीय हित बाजूला ठेवले, मात्र सर्वच ठिकाणी अशी भूमिका घेतली गेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काही जणांनी स्वतःचा राजकीय मार्ग निवडला, तर काहींनी युतीधर्माला प्राधान्य दिले, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

जळगावमध्ये रेश्मा काळे यांनी सुरुवातीला अपक्ष उमेदवारी दाखल करून महायुतीसमोर आव्हान उभे केले होते. भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर आणि मुंबईत झालेल्या चर्चांनंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे जळगावमध्ये महायुतीला एकसंघ लढत देता आली आणि अधिकृत उमेदवाराला फायदा झाला.

याउलट नाशिकमध्ये बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आले नाही. स्थानिक पातळीवरील समीकरणे, नाराज गटांची साथ आणि अपक्ष उमेदवाराभोवती तयार झालेले वातावरण यामुळे गोकुळ गीतेंना मोठा फायदा झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या विजयामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, या निकालामुळे महायुतीतील समन्वय, स्थानिक नेतृत्वाची ताकद आणि बंडखोरी हाताळण्याच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यभरात विजयाचा जल्लोष सुरू असतानाच नाशिकमधील निकालाने महायुती नेतृत्वाला आत्मपरीक्षणाची संधी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि इतर राजकीय लढतींच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा हा निकाल महत्त्वाचा राजकीय संदेश देणारा ठरत आहे.