‘सभेला गर्दी होते, मग मतं कुठे जातात?’; निवडणूक आयोगातील वाद समोर येताच राज ठाकरेंचा संताप, फेसबुक पोस्टमधून जोरदार हल्लाबोल..

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील निवडणूक आयोगाच्या कारभारावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले आहेत.
मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे आणि पुनर्स्थापित करणे, फॉर्म ६ तसेच मतदारयादीच्या डिजिटल व्यवस्थापनासंदर्भात हे आक्षेप असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

या वृत्तानंतर विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.


याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.
‘आम्ही आधीपासूनच प्रश्न उपस्थित करत होतो’
राज ठाकरे यांनी म्हटले की, २०२५ च्या अखेरीस महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या आधी विरोधी पक्षांचे नेते राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटत होते. त्यावेळी आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न निर्माण झाले होते आणि आपण याबाबत सार्वजनिकरित्या अनेकदा बोललो असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्ताचा संदर्भ देत, आपण आणि आपल्या पक्षाने निवडणूक आयोगाच्या कारभारावर यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांना या वृत्तामुळे आधार मिळत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.
‘दोन आयुक्तांनी १४ वेळा आक्षेप नोंदवले’
राज ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगात सध्या तीन आयुक्त असून त्यापैकी दोन आयुक्तांनी गेल्या १० महिन्यांत आयोगाच्या कारभारावर १४ वेळा ऑन-रेकॉर्ड आक्षेप नोंदवले आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, फॉर्म ६ आणि मतदारयादीशी संबंधित सॉफ्टवेअरच्या वापराबाबत या आक्षेपांमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
दरम्यान, ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या अहवालातही संधू आणि जोशी यांनी आयोगाच्या काही निर्णयांबाबत त्यांना माहिती देण्यात आली नसल्याची तसेच काही प्रक्रियांबाबत आक्षेप घेतल्याचे नमूद आहे.
मतदारयादीतील बदलांवरही सवाल
राज ठाकरे यांनी मतदारयादीच्या व्यवस्थापनातील डिजिटल प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. स्थानिक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांच्या अधिकारांमध्ये कपात झाल्याचा दावा त्यांनी केला.
गोव्यात अधिकाऱ्यांनी कागदपत्रांच्या तपासणीनंतर ९७ जण पात्र असल्याचे ठरवले होते; मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची सुविधा वेळेत उपलब्ध न झाल्याने अंतिम यादीत त्यांची नावे आली नसल्याचा दाखला त्यांनी दिला.
पश्चिम बंगालमधील मतदारयादीशी संबंधित अपील प्रक्रियेचाही राज ठाकरे यांनी उल्लेख केला. या सर्व प्रक्रियांमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांच्या अधिकारांबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
‘ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याशिवाय पर्याय नाही’
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना राज ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयांमागे कोणाची भूमिका होती याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
‘ईव्हीएमविरोधात जन आंदोलन उभं करा’
राज ठाकरे यांनी पुढे विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधातील लढाई अधिक ताकदीने आणि एकजुटीने लढण्याची गरज आहे.
तसेच ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी जन आंदोलन उभे करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, या संपूर्ण वादावर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देताना निर्णय एकमताने घेतले जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयोगातील कथित मतभेदांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.