‘पैशांचा पाऊस’ अन् पैसे दुप्पट करण्याचे आमिष; अहिल्यानगरमध्ये 93 लाखांच्या बनावट नोटा जप्त, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर : ‘पैशांचा पाऊस पाडू’ आणि ‘तुमचे पैसे दुप्पट करून देऊ’, असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
नागरिकांकडून खरे पैसे घेऊन त्याबदल्यात बनावट नोटा देत फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल 93 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

500 रुपयांच्या 93 लाखांच्या बनावट नोटा जप्त
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय चलनाच्या बनावट नोटांचा मोठा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगरमधील वडगाव गुप्ता परिसरात छापा टाकला.


या कारवाईत पोलिसांनी गणेश शेवाळे, सुमित चंदनशिवे आणि सूरज कांबळे या तिघांना ताब्यात घेतले. तिन्ही आरोपी बारामती येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांची एकूण किंमत तब्बल 93 लाख रुपये असल्याचे समोर आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा साठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक
प्राथमिक तपासात आरोपी नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून फसवत असल्याचे समोर आले आहे. ‘तुमच्यावर पैशांचा पाऊस पाडू’, तसेच ‘तुमचे पैसे दुप्पट करून देऊ’, अशी आश्वासने संबंधित व्यक्तींना दिली जात होती.
या आमिषाला बळी पडलेल्या नागरिकांकडून आरोपी आधी खरे पैसे घेत होते. त्यानंतर बनावट नोटांच्या माध्यमातून पैसे दुप्पट झाल्याचा किंवा पैशांचा पाऊस पडल्याचा भास निर्माण करून संबंधितांची फसवणूक केली जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
मालेगावातून 25 हजार रुपयांना आणल्या बनावट नोटा
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपींनी बनावट नोटांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या बनावट नोटा 25 हजार रुपये देऊन मालेगाव येथून आणल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांकडून आता बनावट नोटांचा स्रोत शोधला जात आहे. या नोटा नेमक्या कुठे तयार केल्या जात होत्या, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या नेटवर्कमध्ये किती जण सहभागी आहेत, याचा तपास सुरू आहे.
तीन आरोपी अटकेत; दोन साथीदार फरार
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने गणेश शेवाळे, सुमित चंदनशिवे आणि सूरज कांबळे या तिघांना अटक केली आहे. मात्र, टोळीतील आणखी दोन साथीदार फरार असल्याची माहिती आहे. हे दोन्ही आरोपी अहिल्यानगर शहरातील असल्याचे समोर आले आहे.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आतापर्यंत किती जणांची फसवणूक?
या टोळीने आतापर्यंत किती नागरिकांची अशा पद्धतीने फसवणूक केली आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बनावट नोटांचे हे नेटवर्क किती मोठे आहे, याचाही शोध घेतला जात आहे.
तसेच जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांपैकी काही नोटा यापूर्वी बाजारात चलनात आणल्या आहेत का, याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. या प्रकरणाच्या तपासातून बनावट नोटांच्या संपूर्ण नेटवर्कची आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
