राज्यात पावसाचा हाहाकार! सरकारने मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवं होतं…


पुणे : आज राज्यात अतिवृष्टीने ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे. तसेच बेरोजगारीचा प्रश्न चव्हाट्यावर येऊन राज्यातला युवा बेहाल झाला आहे. परंतु सरकार मात्र याकडे लक्ष न देता जाती-जातीत भांडणं लावून मूळ मुद्यावरून लक्ष विचलित करू पाहत आहे.

वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते रस्त्यावर उतरत आहेत. पण हेच नेते सरकारमध्ये वेगवेगळ्या पदांवर असूनही सरकारकडे पाठपुरावा करत नसतील तर याचा अर्थ काय घ्यायचा? राज्यातला सामाजिक तणाव सरकार पुरस्कृत आहे असा अर्थ घ्यायचा का? केवळ सत्तेत बसून आणि सामाजिक नेतृत्व घेऊन प्रश्न पेटवत ठेवणे आणि समाजा-समाजात फूट पाडणे योग्य नाही.

प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचं आहे. केंद्र तसेच राज्यात एखादी सत्ता असूनही पाठपुरावा होणार नसेल, सामाजिक प्रश्न सुटणार नसतील अशा एकहाती सत्ता असलेल्या सरकारचं काय लोणचं घालायचं का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला केला आहे.

सर्वच जातीचे शेतकरी आज अतिवृष्टीने उध्वस्त झाले आहेत, सर्वच जातीचे युवा आज बेरोजगारीच्या झळा सोसत आहेत, सरकारने कालच्या मंत्रिमंडळात बैठकीत यावर निर्णय घेऊन आज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मदत पॅकेज जाहीर करायला हवं होतं, जाहिरातीपेक्षा या पद्धतीच्या शुभेच्छा अधिक योग्य राहिल्या असत्या.

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. यामुळे विरोधक मदतीची मागणी करत आहेत. अनेक शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल देखील उचलत आहेत. यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!