राज्यातील 18 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; अवकाळी पावसाचे थैमान, पुढील 24 तास महत्त्वाचे…

पुणे : केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र राज्यात अद्याप अधिकृतरीत्या मॉन्सून दाखल झालेला नसतानाच अनेक भागांत अवकाळी पावसाने जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे विदर्भातील अनेक भाग अजूनही उष्णतेच्या झळा सहन करत आहेत. अकोला, वर्धा, ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अमरावती, भंडारा, गोंदिया आणि जळगावमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले.
‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
आज अहिल्यानगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

15 जूनपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांत 15 जूनपर्यंत अवकाळी पावसाची स्थिती कायम राहू शकते. लातूर जिल्ह्यातील उदगीर भागात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. मात्र या पावसामुळे वातावरणातील उष्णता काही प्रमाणात कमी झाली आहे.

उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातही दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने तापमानातही घट झाली.
केरळमध्ये मॉन्सून दाखल, महाराष्ट्राची प्रतीक्षा
यंदा केरळमध्ये मॉन्सून दोन दिवस उशिराने दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पुढील काही दिवसांत मॉन्सूनच्या प्रगतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी हवामानाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.