नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वारगेट ते जिल्हा न्यायालय मेट्रोचे लोकार्पण ! पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनासाठी एकनाथ शिंदेकडून अधिकाऱ्यांना सूचना ….
पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ तर टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा स्मारकाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्यात आले. या अनुषंगाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पुण्याचा चहूबाजूनी विस्तार होत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, शैक्षणिक संस्थेचे जाळे वाढत आहेत. याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून प्रदूषणातही वाढ होत आहे, त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून याकरीता मेट्रोसारखे प्रकल्प महत्वाचे आहेत, आगामी काळात मेट्रोचे जाळे वाढविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दूरदृष्यप्रणालीद्वारे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, आश्विनी जगताप, आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या मदतीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज राज्यात विविध उद्योग येत असून उद्योगाला चालना देण्याकरीता राज्य शासन सहकार्य करीत आहेत. राज्यात ५२ टक्के परदेशी गुंतवणूक झाली आहे, विविध क्षेत्रातील उद्योजक राज्याकडे आकर्षित होऊन उद्योगाला चालना देत आहेत. आपले राज्य उद्योगस्नेही झाले असून उद्योग आणि पायाभूत सुविधेत देशात महाराष्ट्र अग्रेसर झाले आहे.
पुरंदर विमानतळाकरीता भूसंपादनाची कार्यवाही करा
पुरंदर विमानतळाकरीता लवकरात लवकर जागा अधिग्रहित करुन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा. याबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरीता केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय आणि उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, आगामी काळात पुरंदर विमानतळाचे काम सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाकरीता राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याठिकाणी ऐतिहासिक स्मारक होत आहे असेही शिंदे म्हणाले.