मोठी बातमी! पुरंदर विमानतळाचे दसऱ्यालाच सिमोउल्लंघन! जुन्या जागेवरच शिंदे , फडणवीस व पवार सरकार करणार फेरअधिसूचना..!!

पुरंदर : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. दसऱ्यापासून पुरंदरच्या विमानतळाचे भूसंपादन सुरू करण्यात येणार असल्याचा दुजोरा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. याकरिता प्रशासकीय पातळीवरील सर्व नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळाबाबत पुढाकार घेतला आहे. तातडीने भूसंपादन करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीवेळी केलेल्या आहेत. याकरिता राज्य सरकार दसऱ्यापर्यंत पैसे उपलब्ध करून देणार आहे.
तसेच समृद्धी महामार्गाच्या पार्श्वभूमीवर तातडीने पुरंदर विमानतळाचे भूसंपादन करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार तसेच एअरपोर्ट अॅथॉरिटी, संरक्षण मंत्रालयाने पुरंदरच्या जागेसाठी हिरवा कंदील दाखविला आहे.
पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागणार आहेत. एवढी मोठी रक्कम एका टप्प्यात उपलब्ध करून देणे राज्य सरकारला शक्य नाही. ही रक्कम राज्य सरकारला अदानी समूहाने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. तसा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. राज्य सरकार त्या निधीच्या माध्यमातून भूसंपादन करू शकते, याचीही चाचपणी सरकारने सुरू केलेली आहे.