आता पुण्यातील गुंडांची खैर नाही! रेल्वे स्टेशनवर पाऊल ठेवताच AI देणार पोलिसांना खबर

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. स्टेशन परिसरात एआय (AI) आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने सुसज्ज 160 नवीन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
या नव्या यंत्रणेमुळे संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, गुन्हेगारांची ओळख पटवणे, हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि गर्दीचे व्यवस्थापन करणे अधिक सोपे होणार आहे.

पुणे रेल्वे स्टेशन हे राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून, येथे दररोज दीड लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. नव्याने बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांपैकी 19 कॅमेरे 4K रिझोल्यूशनचे आहेत. विशेष म्हणजे, या प्रणालीला रेल्वे सुरक्षा दलाकडे (RPF) असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या छायाचित्रांचा डेटाबेस जोडण्यात आला आहे.


यामुळे एखादा संशयित किंवा रेकॉर्डवरील गुन्हेगार स्टेशन परिसरात दिसताच संबंधित कॅमेरा त्याचा चेहरा ओळखून RPF नियंत्रण कक्षाला तात्काळ अलर्ट पाठवणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा माग काढणे आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करणे अधिक सुलभ होणार आहे.
याशिवाय, हरविलेल्या व्यक्तींचे फोटो या सिस्टीममध्ये अपलोड केल्यास संबंधित व्यक्ती कॅमेऱ्यासमोर येताच सुरक्षा यंत्रणेला तत्काळ सूचना मिळणार आहे. तसेच एखाद्या पादचारी पुलावर किंवा प्लॅटफॉर्मवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यासही ही प्रणाली अलर्ट देणार आहे.
सध्या पुणे रेल्वे स्टेशनवर एकूण 235 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यापैकी 160 नवीन AI-आधारित, तर 75 जुने कॅमेरे आहेत. पुढील सहा महिन्यांत जुने कॅमेरे हटवून संपूर्ण स्टेशन अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेने सुसज्ज केले जाणार आहे.
रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेशी संबंधित एक हजाराहून अधिक गुन्हेगारांची माहिती आणि छायाचित्रे या प्रणालीमध्ये समाविष्ट केली आहेत. त्यामुळे आता रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पुणे रेल्वे स्टेशनवर पाऊल ठेवताच त्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळणार असून, रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.