पुण्यातले बहाद्दर गूगल वापरून टाकायचे डल्ला, कांड ऐकून व्हाल हैराण, नेमकं काय करायचे?

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड याठिकाणी एका अजब चोरीची घटना उघडकीस आणली आहे. इथं दोन चोरटे थेट गूगलचा वापर करून डल्ला मारत होते. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मात्र चोरीच्या या पद्धतीमुळे सगळेच अचंबित झाले आहेत. याबाबत पोलिसांनी सलीम सिकंदर शेख आणि अजित अर्जुन पिल्लई याला अटक केली आहे.
घटनेतील एक आरोपी उच्चशिक्षित असून तो चोरी करण्यासाठी गूगलचा वापर करत होता. मात्र चोरी करताना कोणतंही तंत्रज्ञान वापरत नव्हता. चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत. आरोपी गुगलवरून व्यावसायिक कार्यालयाचे पत्ते शोधून चोरी करायचे. चोरी करण्यासाठी बस, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर ते करीत असत.
चोरी करताना ते आपला मोबाइल फोनही बंद ठेवत असत. दोघांकडून पोलिसांनी दोन लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकणे चौकात पाचव्या मजल्यावरील व्यावसायिक कार्यालयामध्ये चोरीची घटना घडली होती.
या कार्यालयामधून ३६ हजार रुपये चोरीला गेले होते. याचा तपास करताना पोलिसांनी १२ दिवसांत तब्बल ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून त्यांनी संशयितांची ओळख पटवली. रात्री काळेवाडी परिसरात दोन्ही संशयित पायी चालत जात होते. यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे सगळेच हैराण झाले आहेत. दरम्यान, सलीम याच्याविरोधात मुंबई शहर येथे घरफोडीचे ६२ गुन्हे दाखल आहेत. तर अजित याच्याविरोधात २० गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून घटनेचा तपास केला जात आहे. याबाबत अनेक गुन्हे समोर आले आहेत.