पुणेकरांनो ‘या’ मेसेजपासून सावध राहा, अन्यथा सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकाल, लाखो रुपयांना घातला जातोय गंडा…

पुणे : पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन पार्ट-टाईम नोकरीचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुरुवातीला काही रक्कम जमा करून विश्वास संपादन करत, नंतर १८ लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळण्यात आली.
तसेच शास्त्रीनगर येथे राहणारे ६७ वर्षीय गणेश कृष्णमूर्ती अय्यर यांना १२ मार्च ते ३० मार्च या कालावधीत सायबर चोरांकडून त्यांच्या मोबाईलवर पार्ट-टाईम जॉब संदर्भात एक संदेश प्राप्त झाला. त्यांना एका लिंकद्वारे काही टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले.
दरम्यान , सुरुवातीला विश्वास बसावा यासाठी, गुन्हेगारांनी अय्यर यांच्या बँक खात्यात ११,७८९ रुपये जमा देखील केले. त्यानंतर मात्र, रिचार्ज करण्याच्या किंवा इतर कामांच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे पाठवण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला.
सायबर भामट्यांच्या या जाळ्यात अडकून गणेश अय्यर यांनी टप्प्याटप्प्याने त्यांना पैसे पाठवले. अशा प्रकारे त्यांची एकूण १८ लाख ६३ हजार ३९५ रुपयांची फसवणूक झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अय्यर यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. गणेश अय्यर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.