लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी मोर्चाला मोठा धक्का! पाटसहून मुंबईकडे निघणाऱ्या १ सप्टेंबरच्या मोर्चाला यवत पोलिसांचा नकार

पुणे : राज्यातील ओबीसी आरक्षणातील कथित घुसखोरी, बोगस आणि बनावट ओबीसी जातीचे दाखले रद्द करावेत, यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या आंदोलनासाठी दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावरून मुंबईकडे मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, यवत पोलिसांनी पाटस येथून निघणाऱ्या मोर्चाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या या निर्णयानंतरही कोणत्याही परिस्थितीत पाटस टोलनाक्यावरून मुंबईकडे मोर्चा काढण्यावर ओबीसी कार्यकर्ते ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाटस परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढण्याची शक्यता असून, परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.


दौंड, बारामती, इंदापूरमध्ये मोर्चाची तयारी
१ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात ओबीसी-भटक्या विमुक्तांचा महामोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी लक्ष्मण हाके मागील काही दिवसांपासून दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांचा दौरा करत आहेत.
तीनही तालुक्यांमध्ये ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाची मोठी संख्या असल्याने हाके यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा केली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यावरून मोर्चेकरी मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते.
पोलिसांनी परवानगी का नाकारली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील आझाद मैदान येथील आंदोलनाला अद्याप संबंधित पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पाटस येथून मुंबईकडे निघणाऱ्या मोर्चालाही सध्या परवानगी देता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय मोर्चाचे नेमके स्वरूप, सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या आणि मोर्चाचा मार्ग याबाबतचा रोडमॅप प्रशासनाकडे सादर करण्यात आलेला नसल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे मोर्चाला परवानगी देण्याचा निर्णय तूर्तास प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले, ‘अटक झाली तरी मोर्चा निघणारच’
मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
१ तारखेला कोणत्याही परिस्थितीत आम्ही मोर्चा काढणारच. आम्हाला अटक झाली तरी चालेल, मात्र आम्ही मोर्चा काढणारच आहोत. ओबीसी आणि भटक्या समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणार असून, तो आवाज कोणीही दाबू शकत नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
त्यामुळे १ सप्टेंबर रोजी पाटस टोलनाक्यावरून मुंबईकडे मोर्चा निघणार का आणि प्रशासन त्याला कशा पद्धतीने हाताळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.