जेवण झालं, दोन पावलं चालले अन् अचानक काळाने गाठलं; अदिती तटकरेंच्या कार्यालयातील पीआरओचा दुर्दैवी अंत


मुंबई : महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी संबंधित जनसंपर्काचे काम पाहणाऱ्या आशिष मेटे या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात घडली. जेवण केल्यानंतर इमारतीच्या आवारात फेरफटका मारत असताना आशिष अचानक जमिनीवर कोसळले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह परिचितांना मोठा धक्का बसला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आशिष मेटे हे जेवण झाल्यानंतर इमारतीच्या आवारात चालत होते. त्याचवेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

आशिष मेटे हे अदिती तटकरे यांच्या कार्यालयात थेट सरकारी सेवेत कार्यरत नव्हते. ते बाह्य यंत्रणेद्वारे एका जनसंपर्क कंपनीच्या माध्यमातून PRO म्हणून काम पाहत होते. मंत्री कार्यालयाशी संबंधित प्रसिद्धी आणि जनसंपर्काची कामे ते सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भांडुप पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून घटनेचा प्राथमिक तपास सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आशिष अचानक नेमके कोणत्या कारणामुळे खाली कोसळले, त्यांच्या मृत्यूमागे वैद्यकीय कारण काय होते, याचा तपास केला जात आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आशिष मेटे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या परिचितांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!