पुणेकरांनो सावधान! घराबाहेर पडणार असाल तर ‘ही’ बातमी वाचा, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा…

पुणे : गेल्या अनेक वर्षांचे प्रचलित आडाखे मोडत राज्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रात अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, दौंड, इंदापूर, माळशिरस, कान्हेरी, पंढरपूर या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. बारामती तालुक्यात कधी नव्हे इतका पाऊस कोसळला आहे.

तसेच पुणे शहर आणि परिसरात नैर्ऋृत्य मोसमी पावसाने आगमनाची वर्दी देतानाच, रविवारी दिवसभर संततधार कायम राखली आहे. शनिवारी रात्रीनंतर पावसाचा जोर काहीसा वाढला होता, तर रविवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
शहरापेक्षा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक दिसून आला, विशेषतः दौंड आणि बारामती या भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे शहर आणि जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. शहरात रात्री साडेआठपर्यंत ७.७ मिलिमीटर आणि लोहगाव येथे १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, बारामतीमध्ये रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत १३०.२ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असून, शहराच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

वातावरणातील बदलांमुळे गेल्या आठवडाभरापासून पावसाने पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुक्काम ठोकला आहे. रविवारीदेखील पहाटेपासूनच संततधार सुरू झाली. ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झालेच नाही.
दिवसभरात अधूनमधून विश्रांती घेऊन हलक्या आणि मध्यम सरी पडत राहिल्या. सुट्टीसाठी राखून ठेवलेली कामे पावसामुळे रेंगाळली. अनेक जण कारने बाहेर पडल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
दरम्यान, वातावरणातील या घडामोडींमुळे कमाल तापमानातही घट झाली आहे. हवेतील गारवा वाढल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता, ज्यामुळे रात्रीच्या वेळीही गारवा अनुभवता आला आहे.