पुणेकरांनो, बाहेर पडण्याआधी हे वाचा; पुढील 3 दिवस पाऊस धुमाकूळ घालणार, ‘या’ भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. बुधवारी दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे शहरासाठी पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे लोणावळा, महाबळेश्वर आणि इतर घाट परिसरात जाणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (ता. २५) पुणे आणि परिसरात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, शुक्रवारपासून शहरातील कमाल आणि किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या वीकेंडमध्ये पुणेकरांना ढगाळ वातावरण, अधूनमधून पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा अनुभव घ्यावा लागू शकतो.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शहरात जोरदार पाऊस झाला होता. बुधवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाला असला तरी दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले. सलग पावसामुळे तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली असून शहरात सुखद गारवा निर्माण झाला आहे.
पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने सखल भागातील नागरिक, वाहनचालक आणि घाट परिसरात प्रवास करणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.