पुणेकरांनो लक्ष द्या! ओला, उबर, रॅपिडो कॅब्स आता सरकारमान्य दरानुसारच धावणार, १ मे पासून वाढणार भाडे..


पुणे : पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती शहरांतील ओला, उबर आणि रॅपिडो या कॅब सेवांवरील चालकांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १ मे २०२५ पासून हे सर्व चालक सरकारने निश्चित केलेल्या अधिकृत भाडे दरांनुसारच प्रवाशांकडून भाडे आकारणार आहेत.

तसेच याचा अर्थ असा की कॅब सेवा घेणाऱ्या नागरिकांना आता प्रत्येक प्रवासासाठी सरकारमान्य आणि पारदर्शक दर लागू होणार असून, यामुळे प्रवाशांमध्ये असणाऱ्या अनिश्चिततेला पूर्णविराम मिळणार आहे.

या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून चालत असलेल्या “डायनॅमिक प्रायसिंग” किंवा “सर्ज प्रायसिंग”च्या समस्येवर देखील तोडगा निघणार आहे, जिथे गर्दीच्या वेळेत किंवा मागणी वाढल्यावर भाडे अचानक वाढवले जात असे. या निर्णयानुसार नवीन भाडे संरचनेत १.५ किलोमीटर प्रवासासाठी ३७ रुपये आकारले जातील आणि त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी २५ रुपये आकारले जातील.

त्यामुळे १० किलोमीटर प्रवासासाठी एकूण अंदाजे २४९.५० रुपये भाडे लागणार आहे. तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर, सध्या याच अंतरासाठी ओला किंवा उबर गो सारख्या सेवांमध्ये प्रवाशांकडून सरासरी १७५ ते २२५ रुपये पर्यंत भाडे आकारले जात होते.

म्हणजेच, सरकारमान्य दर काहीसा अधिक वाटत असला तरी त्यात पारदर्शकता, स्थिरता आणि विश्वासार्हता यांचा समावेश आहे. विशेषतः अनेक वेळा प्रवाशांना संध्याकाळी, विकेंडला किंवा पावसाच्या काळात अत्यधिक भाडे द्यावे लागते. नवीन दर प्रणालीमुळे या समस्येवर तोडगा निघणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या ओला, उबर आणि रॅपिडो प्लॅटफॉर्मवर 45,000 हून अधिक कॅब्स कार्यरत आहेत. या नव्या प्रणालीमुळे चालकांना स्थिर आणि न्याय्य उत्पन्न मिळेल, तसेच प्रवाशांना सरकारी दरानुसार भाडे देण्याची हमी मिळेल. या नव्या प्रणालीबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी वेळ लागेल, म्हणूनच 1 मेपासून ही योजना लागू होईल. तोपर्यंत एक व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाईल, असे केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

पुण्यातील ओला, उबर आणि रॅपिडो कॅबचे भाडे तपशील

प्रारंभिक भाडे- पहिल्या 1.5 किमी साठी 37 रुपये.
पुढील प्रत्येक किमीसाठी – 25 रुपये.
10 किमी अंतराचे भाडे- साधारण 249.50 रुपये
नव्या प्रणालीचे फायदे

पारदर्शक भाडे – अॅप्सवरील बदलते दर बंद होऊन सरकारी दर लागू होतील.
सहज तपासणी – वेबसाइटद्वारे भाडे तपासता येईल, ज्यामुळे प्रवाशांचा गोंधळ टळेल.
चालकांसाठी स्थैर्य- कॅब चालकांना सातत्यपूर्ण उत्पन्न मिळेल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल.
प्रवाशांसाठी स्पष्टता- प्रवाशांना प्रवासापूर्वी भाड्याचा अंदाज घेता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!