पुणेकरांनो लक्ष द्या! पाणी मिटर नसेल तर पाणी मिळणार नाही, नेमकं कारण काय?

पुणे : पुणे शहरातील पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे लक्षात आले असून, ही गळती थांबवण्याच्या सूचना अलीकडेच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या होत्या.

यानंतर आता पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. आता शहरातील प्रत्येक नळजोडीवर पाणी मीटर बसवणे अनिवार्य करण्यात आले असून, या मोहिमेला वेगाने गती देण्यात आली आहे.
महापालिका अधिकारी मीटर लावण्यासाठी घरी आले असता जर नागरिकांनी विरोध केला, तर संबंधित नळजोड थेट बंद केली जाईल, तसेच IPC 353 अंतर्गत गुन्हा दाखल होईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार पुण्यातील पाणीगळती रोखण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. या अंतर्गत सर्व नळजोडींवर AMR मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या शहरातील २.६३ लाख नळजोडींपैकी १.८५ लाख जुळ्यांवर मीटर बसवले गेले आहेत. उर्वरित ७७ हजारांवर मीटर बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून, ५ ठेकेदारांना हे काम सोपवण्यात आलं आहे.
सध्या नागरिकांकडून दरवर्षी ९०० रुपये पाणीपट्टी घेतली जाते. पण आता मीटर बसवल्यानंतर पाण्याच्या वापरावर आधारित बिल आकारले जाणार आहे. दर १००० लिटरसाठी ८ रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे.