पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता..

पुणे : पश्चिम राजस्थानातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला असून अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पुणे शहरात रविवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून, हडपसर, लोहगाव, कोथरूड, शिवाजीनगर, मगरपट्टा, हवेली आणि चिंचवड या भागांत पावसाच्या संततधार सरी पडत आहेत. चिंचवडमध्ये सर्वाधिक 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सततच्या पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. सकाळी १० वाजल्यापासून मुठा नदीपात्रात १४,५४७ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. यासोबतच वरसगाव आणि पानशेत धरणांतूनही विसर्ग सुरू आहे. परिणामी भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा फटका पुणे जिल्ह्यातील सखल भागांना बसला आहे. थेऊरमध्ये ५० घरांमध्ये पाणी शिरले असून एनडीआरएफच्या जवानांनी ५० ते ६० नागरिकांची सुटका केली आहे. इंदापूर आणि धायरी येथेही घरात पाणी घुसल्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

पुणे-सोलापूर रोडवरील लोणी आणि वाकवस्ती भागात अनेक गाड्या पाण्यात अडकल्या आहेत. काही घरांतही पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून, ग्रामीण भागातील हालअपेष्टा अधिक वाढल्या आहेत.
दरम्यान, शिरूरसह इतर भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचून शेती तळ्यात रूपांतरित झाली आहे. इंदापूर तालुक्यातील काझड येथे जोड कालवा फुटल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी गेले आहे. बारामती परिसरातही रात्री पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.