पुणेकरांनो सावधान! फक्त पनीरच नाही; तुमच्या ताटातील ‘हे’ पदार्थही असू शकतात भेसळयुक्त, FDA च्या कारवाईने खळबळ…


पुणे : पुणे शहरात भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या विशेष अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी शहरातील १७ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४७ लाख ३६ हजार रुपयांचा संशयास्पद खाद्यसाठा जप्त करण्यात आला.

सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर या भागांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये १३,१२७ किलो खवा, २,८०६ किलो पनीर, ९६० किलो तूप आणि १३८ किलो चीजचा समावेश आहे. या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय असल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी एकूण ३५ नमुने संकलित केले असून, प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित विक्रेते किंवा उत्पादकांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, FDA ने पुण्याबरोबरच सातारा जिल्ह्यातही मोहीम राबवली. माण, जावळी आणि कराड तालुक्यांमध्ये तूप, फरसाण आणि शेव विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत सुमारे २ लाख ३८ हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला असून चार नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

FDA अधिकाऱ्यांनी नागरिकांना उघड्यावर विक्री होणारे किंवा संशयास्पद वाटणारे दुग्धजन्य पदार्थ खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!