Pune News : पुण्यात राडा! ललित कला केंद्रात भाजप कार्यकर्त्यांकडून तोडफोड, १० ते १२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…

Pune News : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्रात शनिवारी (३ फेब्रुवारी) भाजप कार्यकर्त्यांनी राडा घालत तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशीसाठी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमार्फत रामायणामधील घटनेवर आधारित ‘जब वी मेट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र, या नाटकातील संवादावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. Pune News

यावेळी काही जणांनी कला केंद्राची तोडफोड करत नाटकाचा प्रयोग उधळून लावला. इतकंच नाही, तर काही भाजप कार्यकर्त्यांनी नाटकातील काही कलाकारांना धक्काबुकी करत प्रेक्षकांना देखील हाकलून लावले.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी नाटकातील संवादातून भावना दुखावल्या प्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह ६ जणांना अटक केली. त्याचबरोबर ललित कला केंद्रात तोडफोड करत कलाकार तसेच प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.